यवतमाळ - बालकांच्या जिवाशी खेळण्याचे काम महाविकास आघाडी शासन करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या प्रकरणात स्वतः जाऊन 48 तासात संबंधितांवर गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले होते. आज त्याला एक महिना लोटला. तर, यवतमाळ जिल्ह्यातील कापसी (कोपरी) येथे 12 बालकांना पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले. या प्रकरणातसुद्धा कुठल्याच संबंधितांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे, हे सरकार बालकांचे हत्यारे आणि बलात्काऱ्यांना राजाश्रय देणारे सरकार असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.
हेही वाचा -आदिवासींचे जीवन बदलणार..! 67 वनहक्क लाभार्थ्यांना 94.46 हेक्टर जमिनीचे वाटप
चित्रा वाघ या काल जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथील 12 बालकांच्या पालकांच्या भेटीसाठी आल्या होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, भंडारा येथील दुर्घटनेतील बालकांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदत केली की, शासनाची जबाबदारी संपली का? असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला. त्याचबरोबर, जिल्ह्यातील कापसी (कोपरी) येथे झालेल्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 12 बालके मृत्यूच्या दारातून परत आली. अशा प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी असते. ती नेमायला पाहिजे होती. मात्र, अशी कुठल्याच प्रकारची कमिटी नेमण्यात आली नाही. आणि पोलिसांना त्याचा अहवालही देण्यात आला नाही. त्यामुळे, हे शासन बालकांप्रती किती उदासीन आहे, हे दिसून येते. दोन्ही घटनेत अजूनही कुणावरती गुन्हा दाखल झाला नसल्याने हे सरकार कोणाला वाचवित आहे, असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.