यवतमाळ- कोरोनातून पूर्णपणे बरा झालेला व्यक्ती पुन्हा पॉझिटिव्ह आला असेल तर त्याचे पूर्वीचे आणि आताचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेला पाठवा. जेणेकरून दोन्ही नमुन्यांमधील बदल लक्षात येईल. विषाणू पुन्हा आपले हातपाय पसरवित आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्प्रेडर’ मुळे कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रित करून संक्रमण रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी दिले.
दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आलेल्यांचे नमुने ‘एनआयव्ही’ला पाठवा - दीपक म्हैसेकर
कोरोना विषाणू पुन्हा आपले हातपाय पसरवित आहे. विशेष म्हणजे ‘सुपर स्प्रेडर’ मुळे कोरोनाचा धोका जास्त असल्यामुळे प्रशासनाने त्यावर लक्ष केंद्रित करून संक्रमण रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी दिले.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. ज्या भागातून पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा. या भागातून कोणीही बाहेर येणार नाही, याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे. बाहेर येणारे ‘सुपर स्प्रेडर’च अधिक धोकादायक ठरू शकतात. आरोग्य पथकाद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाची पुन्हा पडताळणी केली पाहिजे. जेणेकरून योग्य वस्तुस्थिती समोर येईल. सर्व्हे दरम्यान संबंधितांच्या ऑक्सिजन पातळीची नोंद अतिशय गांभीर्यपूर्वक करा. सर्वेक्षण योग्य पध्दतीने झाले तर उपचाराची चांगली संधी असून जिल्ह्याचा मृत्युदर कमी होण्यास मदत होईल.
प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी
जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार दीपक म्हैसेकर यांनी यवतमाळ शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. यात शिरे ले-आऊट आणि साईनाथ ले-आऊट चा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी एम. देवेंद्रर सिंह, पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.