यवतमाळ -राज्य सरकार बदलेल असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच टोला लगावला. मी कोणताही भविष्यकार नाह. मात्र, चंद्रकांत पाटील यांना भविष्य कळत असेल म्हणून ते बोलले असतील, असे मंत्री चव्हाण म्हणाले. यवतमाळ येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
'महाविकास आघाडी स्थिर' -
भाजपाच्या नेत्यांनी ज्यापद्धतीने आरोप सुरू केले आहे, ते चुकीचे आहे. सरकारच्या कामात अडथळा निर्माण करणे योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचे सरकार असो, व्यक्तिगत पातळीवर जाऊन आरोप करणे, काम करू न देणे चुकीचे आहे. काहीही आरोप करायचे आणि बदनामी करावी, हे उचित नाही, अशा शब्दात मंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा समाचार घेतला. संभाजी ब्रिगेड व भाजपाच्या युतीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बदलत असतात, त्यातला हा भाग आहे. मात्र, महाविकास आघाडी स्थिर असून पाच वर्षे सरकार टिकेल, असेही ते म्हणाले.