यवतमाळ : Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना ९ सप्टेंबरला आंध्र प्रदेश सीआयडीनं अटक केली. ३५० कोटींच्या कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक ठिकठिकाणी आंदोलनं करून याचा निषेध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता यवतमाळ जिल्ह्यातही चंद्रबाबूंच्या समर्थनार्थ आंदोलन होणार आहे.
मारेगाव येथे ५०० शेतकरी आंदोलन करणार : चंद्रबाबू नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ५०० शेतकरी मारेगाव येथे आज (सोमवार, १८ सप्टेंबर) आंदोलन करणार आहेत. चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशातील राजमुंद्री मध्यवर्ती कार्यालयात बंद असून त्यांना माओवाद्याकडूनही धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. अटकेच्या वेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रदर्शन करत अटकेला विरोध केला होता. आता त्यांची सुटका होईपर्यंत विविध ठिकाणी उपोषणं व आंदोलनं सुरू राहणार असल्याचं समर्थकांनी सांगितलंय.
चंद्रबाबू नायडू यांच्या समर्थनार्थ बीआरएस आमदार : चंद्रबाबू नायडू यांच्या समर्थकांनी रविवारी तेलंगाणामधील विविध शहरांमध्ये आंदोलन केलं. नायडू यांना केलेल्या अटकेचा तीव्र निषेध टीडीपी कार्यकर्त्यांनी यावेळी केला. हैदराबादमधील वनस्थलीपुरम येथं रविवारी निदर्शनं करण्यात आली. यामध्ये बीआरएस आमदार सुधीर रेड्डी यांच्यासह सुमारे २५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. वनस्थलीपुरममध्ये आंध्र प्रदेशातील नागरिक मोठ्या संख्येनं राहतात.
अजामीनपात्र गुन्हा दाखल : माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश कौशल्य विकास घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ते क्रमांक एकचे आरोपी आहेत. त्यांच्यावर नोंदवण्यात आलेला गुन्हा अजामीनपात्र असून, ते केवळ कोर्टामार्फतच जामीन मागू शकतात.
हेही वाचा :
- Chandrababu Naidu Arrested : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक
- Skill development case : ३७१ कोटींचं स्किल डेव्हलपमेंट प्रकरण आहे तरी काय, चंद्राबाबू नायडूंना या प्रकरणी झालीय अटक
- Chandrababu Naidu 14 Days Remand: चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणीत वाढ, एसीबी कोर्टानं दिली 14 दिवसांची कोठडी