यवतमाळ -आपसी वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात ( Murder in Yavatmal ) आली. ही घटना दिनांक 30 जून रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पाटीपुरा परिसरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी तात्काळ दक्षता घेत चार मारेकऱ्यांना अटक केली तर एक जण फरार आहे. विशाल कृष्णा रामटेके (22) रा. पाटीपुरा असे मृत तरुणाचे नाव आहे. तर विनोद तामगाडगे (40) प्रमोद तामगाडगे ( 35), भगवान तामगाडगे (50), चिनी ऊर्फ अनिकेत बागडे ( 20), प्रशिक भगत (18) व अमित भगत (20 ) सर्व राहणार आंबेडकर नगर पाटीपुरा असे आरोपींची नावे आहेत. ( brutal murder of young man in mutual dispute)
मला मधात टाकू नका - घटनेनंतर मृतकाची आई सुनिता कृष्णा रामटेके ( 39) यांनी यवतमाळ शहर पोलिसात याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून फिर्यादी ही आपल्या दोन मुले मृतक विशाल व सुनिल सोबत पाटीपुरा येथे राहते. दिनांक 29 जून रोजी रात्री साडे दहा वाजता विशाल याला बोलवून प्रमोद तामगाडगे याने मोहल्यातील अंकीत मेश्राम याच्या सोबत तु राहू नको व त्याचा साथ देवू नको असे म्हटले. त्यावर विशाल याने मोहोल्यातील सगळ्यांसोबतच राहाव लागते. तुमची आपसातले भांडण तुम्ही निपटवा मला मधात टाकू नका असे सांगितले.
खुनाचा गुन्हा दाखल - दरम्यान दुसऱ्या दिवशी 30 जुन रोजी अंदाजे रात्री 10:30 वाजताच्या सुमारास विशाल मोहोल्यातील भिमराव मेश्राम यांच्या घरासमोर मोकळ्या रस्त्यावर फोनवर बोलत उभा होता. त्याचवेळी विनोद तामगाडगेसह संबधीत चार आरोपींनी विशालला हातातील लाठीने व बुक्याने मारहाण केली. त्याचवेळी अमित भगत व प्रशिक भगत यांनी हातातील चाकुने पोटात मारल्याने विशाल खाली कोसळला. ते पाहून विशालची आई जोरात ओरडत त्यांच्या दिशेने धावली. आरोपींच्या तावडीतून सोडवित असतांना फिर्यादीला देखील दुखापत झाली. त्यानंतर परिसरातील तरुणांनी रक्ताने माखलेल्या जखमी विशालला शासकीय रुग्णालयाल दाखल केले. मात्र उपचाराअंती विशालचा मृत्यू झाला. घटनेच्या गांभीर्य लक्षात घेवून यवतमाळ शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.