यवतमाळ - वणी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपावर कडक शब्दात टीका केली होती. त्यांनी भाजपा-संघावर आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूनम चौकात खासदार बाळू धानोरकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ३१ ऑक्टोबरला रात्री वादाफळे मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि नेते उपस्थित होते. भाषणात, काँग्रेस हा स्वबळावर निवडून येणारा आणि विकास करणारा पक्ष आहे. संगणक क्रांती काँग्रेसच्या सत्ता काळात झाली. त्यावेळी भाजपाने याला विरोध केला. आता ते विकासकामाचे श्रेय लाटत आहे, असे धानोरकर म्हणाले होते.