यवतमाळ - केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजू तोडसाम काही दिवसांपूर्वी पत्नीच्या भांडणामुळे चर्चेत होते. त्यांच्या दोन पत्नींमध्ये भर कार्यक्रमात हाणामारी झाली होती. याप्रकरणी त्यांच्या दुसऱ्या पत्नीने (प्रिया) पहिल्या पत्नीविरोधात (अर्चना) तक्रार नोंदवली आहे. त्यात त्यांनी धिंड काढणे आणि विनयभंग यांसह अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांनी मारहाण झाल्याप्रकरणी अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे. यात त्यांनी आमदारांची पहिली पत्नी अर्चना येडमे-तोडसाम, पांढरकवडाच्या पंचायत समिती सदस्य शीला गेडाम, मनीष रामगीरवार, गणेश घोडाम, नागोराव गेडाम, अक्षय नवाडे, आकाश उर्फ मोनू कनाके, रुपेश चौधरी, महेंद्र कर्णेवार, रणजित चव्हाण यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.