यवतमाळ -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमधील आवाज वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे. त्यामुळे पोलिसांनी सुमोटोच्या आधारे राठोड यांच्यावर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी केली आहे. राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा भुतडा यांनी दिला आहे.
संजय राठोड यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी भाजप करत आहे ऑडिओ क्लिपमधील आवाज राठोडांचाच -
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. यानंतर काही ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. यातील एक आवाज हा वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी आणि सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
काय आहे प्रकरण
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.