यवतमाळ - पुसद येथील रहिवाशी असलेल्या भोंदूबाबा विश्वजीत रामचंद्र कपिले याने संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे सक्रिय कार्यकर्ते तयार केले होते. हे कार्यकर्ते विविध प्रकारे अमिष दाखवून लोकांना भोंदूबाबा जवळ घेऊन येत होते. यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित प्रविण शेरेकर यांनी माहूर गाठून तक्रार दिली. त्यावरून भोंदुबाबा याला माहूर पोलिसानी पुसदवरून अटक केली आहे.
राज्यभर कार्यकर्ते सक्रिय -
भोंदूबाबा कपिले याचे दीपसंध्या हॉटेलजवळ एका कॉम्प्लेक्समध्ये क्रिश फोटो स्टुडिओ आहे. या फोटो स्टुडिओच्या आधारे तो त्याच्या परिवाराचा उदनिर्वाह करीत होता. मात्र त्याला बाबा बनण्याची हौस लागल्याने त्याने त्याच्या जवळील लोकांसोबत संगनमत करून प्रचार सुरू केला. भोंदुबाबा विश्वजित कपिले पीडिताची समस्या जाणून घेत होता. त्यानंतर तो पीडितांना काय करता, तुमचा उद्योग काय, नोकरी करता काय असे प्रश्न विचारून तो पैस गोळा करत होता. पीडितांकडे किती पैसे निघतात, यासाठी त्याने वेगवेगळया कॅटगरी तयार केल्या होत्या. पीडिताला आमिष दाखवून पैसे उकळायचा. भोंदुबाबा हा पीडिताला भेटण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचा व त्याच्या खोटया कारनाम्यामुळे पीडितही फसत जायचे. सन 2013 ते 2020 दरम्यान तक्रारकर्ते प्रवीण निवृत्ती शेरेकर (39 रा. कोपरारोड, डोंबिवली जि. ठाणे) यांना भोंदूबाबने 23 लाख 14 हजार 549 रूपयाने गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे ही वाचा -Health Department Exam : परीक्षार्थींसाठी जिल्ह्यातच परीक्षा केंद्र.. आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण
फसवणूक होताच गाठले पोलीस ठाणे -
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित प्रविण शेरेकर यांनी माहूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून भोंदुबाबा विश्वजीत रामचंद्र कपिले (53), रवी रामचंद्र कपिले (50) कैलास रामचंद्र कपिले (45, सर्व राहणार कदम लेऊट पुसद) यांच्या विरूद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व काळा जादू अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्यांना पुसद येथून ताब्यात घेण्यात आले आहे.