यवतमाळ- जिल्ह्यात विक्रीस बंदी असलेले बीजी बियाणे वडकी येथील विनोद भोयर यांच्या कृषी केंद्रावर छापा मारून जप्त करण्यात आले आहे. यामध्ये बीजी बियाणांची 211 पाकिटे, अंदाजे 1 लाख 55 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांनी केली.
यवतमाळमध्ये विक्रीस बंदी असलेले बीजी बियाण्यांचे 211 पाकिटे जप्त; कृषी विभागाची कारवाई वडकी येथे विक्रीसाठी बंदी असलेली बियाणे कृषी केंद्रांतून विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरून त्याठिकाणी धाड टाकली असता बंदी असलेले सिकंदर नामक आणि इतर कापसाचे बियाणे आढळून आले आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत या कृषी केंद्रातून 211 पाकिटे जप्त केली. यादरम्यान कृषी केंद्राचे संचालक विनोद भोयर फरार झाले असून त्यांचा शोध वडकी पोलीस घेत आहेत.
पेरणीचा हंगाम आल्यावर यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अडाणींचा फायदा घेवून बोगस बियाणे मोठ्या प्रमाणावर विकली जातात. यातून शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणावर फसवणूक होते. कृषी अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलत, अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर धडक कारवाई करत आहेत.
यापूर्वी कृषी विभागाने घाटंजी तालुक्यातील जरूर या गावी 40 पाकिटे, अंदाजे 30 हजार रुपये तर पांढरकवडा तालुक्यातील किंन्हाळा येथे 60 पाकिटे, अंदाजे 70 हजार रुपये किंमतीचे जप्त करण्यात आली, अशा 3 कारवायांमध्ये कृषी विभागाकडून अडीच लाखांची 311 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात बंदी असलेले बीजी बियाणे वणी, मारेगाव, झारीजामनी, वडकी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव, महागाव, उमरखेड या तालुक्यातील शेतकऱ्यांना छुप्या मार्गाने अल्पदरात विक्री करण्यात येते. कमी दरात कपाशीचे बियाणे मिळत असल्याने शेतकरीही खरेदी करतात. हे बियाणे या भागात विक्री होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. कृषी विभागाकडून यावर कारवाई करण्यात आली. मात्र ठोस उपाययोजना न करण्यात आल्याने या बीजी बियाण्यांचा विक्रीचा गोरखधंदा खुलेआमपणे सुरू आहे.