यवतमाळ- बहुजन क्रांती मोर्चाने आज पुकारलेल्या भारत बंदला यवतमाळ शहरात हिंसक वळण लागले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत धरपकड केली. शहरातील मारवाडी चौकात आंदोलकांनी दुकानातील साहित्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व्यापाऱ्याने आंदोलकांवर मिरची पूड भिरकावून फेकल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी नुकसान झालेल्या दुकानात जाऊन पाहणी केली आहे. त्यांनी किशोर पोद्धार या व्यापाऱ्याशी चर्चा केली. व्यापाऱ्यांने, 200 ते 300 आंदोलक आले व त्यांनी दुकान बंद करण्याची मागणी केली. तसेच, दुकातनतील समान फेकले आणि दगडफेक केली, अशी तक्रार नोंदवली आहे. यावेळी पोलिसांनी मार्च काढून आंदोलकांसह नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.