यवतमाळ - बाबा कंबलपोष यांच्या आठवणीनिमित्त आर्णी गावात दरवर्षी उरुसाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही ५ ते ११ फेब्रुवारीदरम्यान उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. आर्णी गाव म्हणजे पूर्वीच्या काळी एक लहान वस्ती होती. त्या वस्तीत सुफीसंत इराणी शाह मियाँ यांचे वास्तव्य होते. अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी आर्णी हे गाव नैसर्गिकरित्या उलथेपालथे झाले होते. म्हणून आर्णीला आजही उलटी पांढरी म्हणून संबोधले जाते. बाबा कंबलपोष जेव्हा आर्णीत आले, तेव्हा शहरात केवळ ५० घरे होती. यादरम्यान बाबा कंबलपोष हे जमाल तेलीच्या घरी राहत होते.
जवळपासच्या खेड्यापाड्यातील सर्वधर्मीय नागरिकांमध्ये बाबा कंबलपोष हे समाजात एकतेचा संदेश देत असत. लोकांना जीवन जगण्याचा सुलभ आणि योग्य मार्ग दाखवण्याचे काम ते करत. त्यामुळे सर्वदूर बाबांची किर्ती पसरली. सैयद हाजी अब्दुल रहेमान उर्फ बाबा कंबलपोष यांचा पेहराव म्हणजे साधा तहेबंद लुंगी, आडव्या गाल्याचा कुर्ता व खांद्यावर कंबल असायची. त्यामुळे बाबांचे नाव 'कंबलपोष बाबा' असे पडले.
बाबा कंबलपोष हे मूळचे अरबस्थानचे रहिवासी होते. हिंदूस्थानात आल्यावर प्रथम बाबा कंबलपोष यांनी सुफी संत खाजा गरिब नवाज अजमेर येथे मुक्काम ठोकला. त्यानंतर पंजाब, उत्तर भारत, असा प्रवास करत दक्षिण भारतातून त्यांनी नांदेड जिल्ह्यातील सुफी संत सोनापीर बाबा व लंगोटबंद शहा बाबा येथे तळ ठोकला. बाबा कंबलपोष यांनी आयुष्यातील ७५ वर्ष माहूर येथील दर्ग्यावर घालवली. ते माहूरला वास्तव्यास असताना सर्वधर्मीय, गोरगरिब, दीनदुबळे लोकांच्या सुखदुःखात सामील होत असत. तसेच माहूर ते आर्णी, असे ते फिरत असत.
बाबा नेहमी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या गुलाम दस्तगीर यांच्या घराजवळ वास्तव्यास असायचे. त्यानंतर नेहमी गावाच्या बाहेर अरूणावती नदीच्या काठी वडाच्या झाडाखाली निवांतपणे बसून आराम करायचे. याचदरम्यान त्यांनी १८ मार्च १९२९ ला (उर्दू दिनदर्शिकेप्रमाणे सोला शव्वाल) समाधी घेतली. त्यानंतर बाबांच्या आठवणीनिमित्त आर्णीत अरूणावती नदीच्या काठी ५ फेब्रुवारी १९३० पासून उरूसाला बच्चू बाबा यांनी सुरूवात केली.
सुरूवातीला उरूस हे २ दिवसांचे असायचे. त्यानंतर एक दोन दिवस वाढत गेले. बच्चू बाबा हे बाबा कंबलपोष यांचे भक्त होते. त्यामुळे बाबांच्या समाधीस्थळी त्यांनी सुरूवातीला टीन पत्राचे बांधकाम केले. कालांतराने त्यात बदल होऊन आज बाबा कंबलपोष यांच्या दर्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. दर्गा ट्रस्टची स्थापना ९ ऑगस्ट १९७७ साली करण्यात आली. त्यानंतर सन २००५ मध्ये नविन कार्यकारिणी नेमण्यात आली. यामध्ये अध्यक्ष ख्वाजा बेग, सचिव रियाज बेग, दत्तुसिंह चंदेल, सहसचिव आकाश आक्कावार आधी पदाधिकारी या ट्रस्टमध्ये नव्याने घेण्यात आले. नव्या ट्रस्टचे सचिव रियाज बेग यांच्या नियोजनामुळे बाबा कंबलपोषची यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे. २००५ साली या यात्रेत केवळ २१० व्यापारी दुकान लावत होते. मात्र, सध्याच्या स्थितीत ९०० व्यापारी दुकाने लावत आहेत.