यवतमाळ - प्रतिकूल परिस्थितीला झुंज देत यवतमाळ येथील रचना कॉलनीमध्ये राहणाऱ्या अझहर काजीने युपीएससी परीक्षेत देशात 315 रँक मिळवला आहे. यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात यवतमाळचा अझहर काझी चमकला. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा चालवीत होते.
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने मिळवलेले यश बघून त्याचे कौतुक होत आहे. अझहर काजीने सातवीपर्यंत अंजुमन उर्दू हायस्कूल या ठिकाणी शिक्षण घेतले होते. तर पुढे आठवी ते दहावी हिंदी हायस्कूलमधून उत्तीर्ण झाला. यानंतर बारावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण आबासाहेब पारवेकर महाविद्यालयातून पूर्ण केले. यावेळी प्राचार्य उदय नावलेकर यांनी युपीएससीच्या परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी वेळोवेळी मदत केल्याचे त्याने सांगितले.
गरिबीवर मात करत अझहरने यूपीएससीत मिळवलं यश; देशातून मिळवला 315 वा रँक
अझहर काझी याने 2012 कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केली. घरची परिस्थिती सामान्य असल्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. ६ वर्षे कॉर्पोरेशन बँकेत शाखा प्रबंधक म्हणून काम केले. अशातच 2018 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. दोन वर्षे अथक परिश्रम घेतल्याचा फायदा झाला. 2018 मध्ये दिलेल्या युपीएससी परीक्षेमध्ये अपयश आले. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही आणि पुन्हा जोमाने अभ्यासाला लागला. अखेर 2019च्या युपीएससी परीक्षेमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात देशात त्याने 315 वी रँक मिळवली.
आपण ग्रामीण भागातील आहोत, यूपीएससीच्या अभ्यासासाठी मोठ्या सिटीमध्ये जाऊनच प्रिपरेशन केले पाहिजे असे काही नाही. नियमित अभ्यास केल्यास या परीक्षेत यश मिळू शकते, हे त्याने आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून दाखवून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन त्याने केले.