यवतमाळ: अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील मालखान्यात 6 वर्षांपूर्वी हेराफेरी झाल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. जप्तीच्या सोन्यात अफरातफर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले आहेत. प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे देण्यात आली. घोटाळ्याप्रकरणी मालखान्याचे पुन्हा निरीक्षण करून रेकॉर्ड तपासले जाईल, अशी माहिती माधुरी बाविस्कर यांनी दिली.
यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील मालखान्यात 6 वर्षांपूर्वी झालेल्या हेराफेरीचे प्रकरण आता उजेडात आले आहे. त्यामुळे आधीच वादग्रस्त ठाणे म्हणून ओळख असलेल्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. 6 वर्षांपूर्वी येथे असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाने चेनस्नॅचरकडून सोन्याचा ऐवज हस्तगत करून मालखान्यात जमा केला होता. मात्र जप्तीतील 300 ग्रॅम सोने मालखान्यात नाही अशी माहिती पुढे आली. त्यामुळे आरोपी व त्यांच्याकडून जप्त सोन्याच्या ऐवजाबाबत संपूर्ण कारवाई झाली नसावी, अशी शंका व्यक्त होत आहे.