यवतमाळ - कोरोनाच्या 'ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी नसल्याने व्यसनाधीन आणि नशेची लत असलेल्या नागरिकांनी चक्क सॅनिटायझर पिण्याच्या घटना समोर येत आहे. वणी येथे चार दिवसांपूर्वीच सॅनिटायझर प्यायल्याने तब्बल आठ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर आज पुन्हा एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नागेश दरवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नागेश करत होता सलूनचा व्यवसाय
दारू न मिळाल्याने त्याने सॅनिटायझर घेतले. मंगळवारी सायंकाळी त्याला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सॅनिटायझर प्यायल्याने आतापर्यंत वणीत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी सात जणांचा मृत्यू
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंद आहेत, त्यामुळे दारूची गरज भागविण्यासाठी सॅनिटायझर पिल्याने वणीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. अनिल चंपत, दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश शेलार, संतोष मेहर, सुनील ढेंगळे यासह एका व्यक्तीचा सॅनिटायझर प्यायल्याने मृत्यू झाला होता. कोरोनाच्या काळात विषाणुपासून बचाव होण्यासाठी सॅनिटायझरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी करण्यात येतो. मात्र, सॅनिटायझमध्ये अल्कोहोल असल्याने काही मद्यपी सॅनिटायझर पिण्याचे प्रयत्न करत असल्याचे यापूर्वीही दिसून आले. सॅनिटायझरमध्ये हानिकार रसायने असल्याने व्यसनी लोकांना जीव गमवावा लागत आहे.
सॅनिटायझरमधील अल्कोहोल आरोग्य रक्षणासाठी - पोलीस अधीक्षक भुजबळ
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो. यात 70 टक्के अल्कोहोल असते. हे अल्कोहोल केवळ आरोग्याच्या रक्षणासाठी आहे. त्याचे प्राशन करणे हे अतिशय धोकादायक आहे. ते पिणे योग्य नाही, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी केले.