यवतमाळ- जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघात भाजप आणि सेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली होती. मात्र, आजच्या निकालात या चारही मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे बंडखोरांची बंडखोरी वाया गेली आहे.
दिग्रस मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे येथील भाजपचे नेते व माजी मंत्री संजय देशमुख यांनी बंडखोरी केली होती. २०१४ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत संजय देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देशमुख यांनी निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात भरपूर तयारी केली. मात्र, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून थेट शिवसेनेचे संजय राठोड यांच्याशी लढत केली. त्यांच्या या पाउलामुळे शिवसेना भाजपशी नाराज झाली होती. संजय देशमुख यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला निवडणुकीत नुकसान होईल, असे समजले जात होते. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय राठोड ६३ हजार ६०७ मतांच्या फरकाने जिंकून आले. विशेष म्हणजे, संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघातून चौथ्यांदा जिकून आले आहेत.
दिग्रस पाठोपाठ आर्णी मतदारसंघात देखील बंडखोरी झाली. भाजपने राजू तोडसाम यांना डावलून माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली. मतदारसंघात त्यांची कार्कीर्द वादग्रस्त असल्याने भाजप पक्षातूनच तोडसाम यांना उमेदवारी न देण्याचे सूर निघत होते. त्यानंतर नाराज राजू तोडसाम यांनी भाजपशी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढली. मात्र, त्यांच्या लढतीने भाजपला नुकसान झाले नाही. उलट भाजपचे उमेदवार डॉ. धुर्वे हे भारी मतांनी निवडून आले. मात्र, राजू तोडसाम यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
यवतमाळ मतदारसंघात देखील शिवसेनेने बंडखोरी केली होती. मतदारसंघात शिवसेनेचे संतोष ढवले यांनी बंडखोरी केली. ते २०१४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडून मतदारसंघात भाजपविरुद्ध लढले होते. मात्र, भाजपचे उमेदवार मदन येरावार यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, यंदा ते अपक्ष म्हणून भाजचे मदन येरावार यांच्या विरुद्ध लढले. निवडणुकी आधी त्यांनी, माझी लढाई भाजपशी नसून भाजपचे उमेदवार मदन येरावार यांच्याशी असल्याची त्यांनी म्हटले होते. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असून मतमोजणीत त्यांना फार कमी मते मिळाली आहेत. ते भाजपचे मदन येरावार आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या जवळपास देखील नाहीत.
वणी मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी देखील बंडखोरी केली. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, वणी मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला गेल्याने ते अस्वस्थ झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून लढत केली. ते मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकूलवार यांच्या विरुद्ध उभे झाले होते. मतदारसंघातील शेतकऱ्यांची समस्या, विकास हे प्रमुख प्रश्न असून त्यासाठी मी उभा असल्याचे त्यांनी सागितले होते. मात्र, यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत इतर मतदारसंघातील सेनेच्या बंडखोरांप्रमाणे त्यांचा देखील सपशेल पराभव झाला आहे. वणी मतदारसंघातून भाजपचे संजीवरेड्डी बोदकूलवार हे २७१२५ मतांनी विजयी झाले आहेत.
हेही वाचा-LIVE निकाल यवतमाळ: यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार विजयी
एकंदरीत, पाहिले तर जिल्ह्यातील या चारही मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी सपशेल फेल झाली. बंडखोर उमेदवार मतदारसंघातील निवडणुकीची समीकरणे बदलू शकण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, तसे काहीच झाले नाही.