महाराष्ट्र

maharashtra

कोविड वार्डात जिवंत रूग्णाला केले मृत घोषित; नातेवाईकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By

Published : Apr 2, 2021, 10:51 AM IST

काहीवेळा रूग्णालयांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यवतमाळमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका जिवंत रूग्णाला मृत घोषित करण्यात आले होते.

Yavatmal
यवतमाळ

यवतमाळ -वसंतराव शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला जिवंतपणी मृत घोषित करण्याचा प्रकार उघडकीला आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित रूग्ण हा ऑक्सिजन लावून उपचार घेत होता. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रूग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी अमोल हेगडे यांच्याकडे तक्रार आणि निवेदन दिले आहे.

नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली

प्रकृती अस्वस्थ असल्याने कोविडचे उपचार -

बाबुळगाव तालुक्यातील दिघी पुनर्वसन येथील देवेंद्र ज्ञानेश्वर कावणकर यांच्या वडिलांना 30 एप्रिलला आजारपणामुळे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. न्यूमोनियाची लक्षणे व ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची कोरोना चाचणीकरून वार्ड क्रमांक 19 मध्ये उपचारार्थ दाखल करून घेतले. कोरोना चाचणीचा अहवाल प्रलंबित असल्यामुळे त्याच वार्डात उपचार सुरू होते. परंतु प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांना वार्ड क्रमांक 25 मध्ये (कोविड वॉर्ड) दाखल करून घेतले, कुटुंबियांनी तशी माहिती देखील दिली.

उपचार सुरू असताना सांगितले मृत -

उपचार सुरू असतानाच 31 मार्चला रात्री अकरा ते बारा वाजताच्या सुमारास वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डातून देवेंद्र कावलकर यांना फोन आला. तुमच्या वडिलांचे हृदयाचे ठोके वाढले असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली गेली. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची बाब कानी पडताच देवेंद्र यांनी तात्काळ 30 किलोमीटर अंतर पार करून यवतमाळ गाठले व कोविड वार्डात जाऊन विचारपूस केली. तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याने तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र हे मृत वडिलांचे शरीर पाहण्यासाठी गेले असता साक्षात त्यांचे वडील ऑक्सिजन लावून बेडवर उपचार घेत असल्याचे दिसले. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. संबंधित डॉक्टरांनी चुकीची माहिती दिल्यामुळे कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा पुढे आला असून यापूर्वी देखील असा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चाचणी आली निगेटिव्ह -

विशेष म्हणजे, संबंधित रुग्णाची कोरोना चाचणी केलेली होती व तिचा अहवाल प्रलंबित होता. असे असतानाही त्यांच्या कोविड वार्डात उपचार सुरू करण्यात आले. 10 ते 12 तास उपचार घेतल्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती देण्यात आली. भरीस भर म्हणजे त्या रूग्णाचा कोरोना अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details