यवतमाळ- क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने एका व्यावसायिकाच्या 18 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्याकडून 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली. शुभम तोलवानी असे त्या आरोपीचे नाव असून तो भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे.
सट्ट्यात पैसे हरल्याने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; पन्नास लाखांची मागितली होती खंडणी त्याच्या 5 साथीदारासह यवतमाळच्या शिवाजी गार्डन परिसरातून ईश्वर नचवाणी या व्यावसायिकाचा 18 वर्षीय मुलगा हर्ष नचवाणीचे गजबजलेल्या परिसरातून सोमवारी सकाळी 11 वाजता चाकूचा धाक दाखवून अपहरण केले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी हर्षच्या वडिलांना फोन करून एक व्हिडिओ तयार करून 50 लाखांची खंडणी मागितली. घाबरून गेलेल्या नचवाणी परिवाराने अवधूतवाडी पोलिसात धाव घेतली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पाऊल उचलले. पोलिसांची 6 शोध पथक तयार करून हर्षचा शोध सुरू केला. त्यानंतर 14 तासाच्या आत या सर्व अपहरणकर्त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने अपहरण करून हरलेले पैसे मिळवण्यासाठी आरोपी शुभम तोलवानी आणि त्याच्या 5 साथीदारानी हर्षच्या अपहरणचा कट रचला होता, हे पोलीस तपासात उघड झाले आहे.
अपहरणकर्त्यांनी घटनेनंतर हर्षला जंगलात मारहाण केली. तसेच त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करत 50 लाखांची खंडणी मागितली. तासाभरात रक्कम मिळाली नाही तर जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली होती. या घटनेत सतर्क पोलिसांनी आरोपींचा शोध घेत यवतमाळजवळील असलेल्या एमआयडीसी परिसरातील जंगल भाग पिंजून काढला. त्यानंतर अवघ्या काही तासाच्या आत आरोपींना अटक केली. आता हर्ष सुखरूप घरी परत आल्याने त्याच्या कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.