यवतमाळ - शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड एकदिलाने काम करत आहेत. मजबूत सरकार बनवण्यासाठी युतीला मतदान करा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
भावना गवळींच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात
भाजप-सेना युती मजबूत असून येत्या ५० वर्षापर्यंत ही युती अशीच कायम राहील, मजबूत सरकार बनवण्यासाठी युतीला मतदान करा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
देशात मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार हवे, देशाला राहुल गांधीसारखा पंतप्रधान हवा की मोदींसारखा असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी मतदारांना विचारले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख भ्रष्टवादी असा केला. भाजप-सेना युती मजबूत असून येत्या ५० वर्षापर्यंत ही युती अशीच कायम राहील, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे संजय राठोड आणि भावना गवळी या मोठ्या नेत्या असून त्यांना मोठी जबाबदारी मिळेल, असे सांगून शिवसैनिकातील संभ्रम दुर केला.
भावना गवळी यांच्याशी विळ्या भोपळ्याचे सख्य असलेल्या संजय राठोड यांच्या मतदारसंघात मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी आदित्य ठाकरे यांनी दारव्ह्यात प्रचारसभा घेतली. सभेसाठी राठोड यांना गर्दी जमविण्याचे नियोजन करावे लागले. दोन्ही नेत्यांत मनोमिलनाचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. या सभेत पहिल्यांदाच राठोड समर्थक पदाधिकारी मंचावर दिसून आले.