महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : ..अन् भाऊ माही पराटी जयली; शेतकऱ्यांची व्यथा सांगणारे लोकगीत तुफान व्हायरल - pain

"पाणी म्हणते येतो अन् हवा म्हणते नाही अशी कशी हवा हे चयली अन् भाऊ माही पराटी जयली"

राहुल बळीराम तेलगोटे

By

Published : Jul 18, 2019, 1:05 PM IST

यवतमाळ -सध्या जिल्ह्यात पावसानं दांडी मारलीय, पाण्याच्या एकेका थेंबासाठी काळी आई व्याकूळ झालीय. पाण्याअभावी जिल्ह्यात तब्बल साडेसहा लाख हेक्टरवरील कपाशीने माना टाकल्या आहेत. हे चित्र पाहून जमिनीसारख्याच शेतकऱ्यांच्या काळजालाही भेगा पडल्या आहेत. मात्र अशाही अवस्थेत शेतकरी आपल्या दुःखाचं रडगाण गात नाही. शेतकऱ्यांच्या याच दुःखाला किनार देणारं एक गीत जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे. या गीताचे बोल आहेत "भाऊ माही पराटी जयली".

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील सिद्धार्थ नगरमध्ये राहणाऱ्या आणि जन्मतःच दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या या गायकाचे नाव आहे, राहुल बळीराम तेलगोटे. राहुल यांना चौथ्या वर्गापासूनच संगीताची आवड लागली. त्यांनी आपले संगीताचे शिक्षण वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे गायन तबला आणि हार्मोनियम यात संगीत विशारदचे शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांच्या,
"पाणी म्हणते येतो अन्
हवा म्हणते नाही
अशी कशी हवा हे चयली
अन् भाऊ माही पराटी जयली"

राहुल बळीराम तेलगोटे

या गीताने सर्वत्र एकच धूम केली आहे. एका गरीब आणि दिव्यांग कलाकाराने या गीताला चाल दिली आहे. विदर्भातील या कलावंताच्या गाण्याचा हा व्हिडिओ गावातील काही तरुणांनी दर्यापूर येथे शूट केला आणि पाहता पाहता तो यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड व्हायरल झाला. या गीतातून शेतकऱ्यांची अस्वस्थता बाहेर पडत असली तरी काही काळासाठी शेत शिवारातील दुःख मात्र या गीताने दूर लोटले जात आहे.

शेतात उभी असलेली पीके या गीतातून पुढे येतात. गोड आवाज अन् ढोलकीच्या तालावर शेतातील हे वर्णन अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे. खरे तर शिवार मात्र मूक आक्रंदन करत आहे, याचा इशारासुद्धा या गीताने दिला आहे. सध्या गाव खेड्यात या गीताची जबरदस्त चर्चा सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details