यवतमाळ -राज्यात गेल्या ५ वर्षात तब्बल १२ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. तसेच त्यावर उपाययोजना म्हणून सरकारने कर्जमाफी केली तरीही शेतकरी आत्महत्तेचे सत्र थांबतच नाही. यवतमाळमध्ये अशाच एका तरुण शेतकऱ्याने पिकाचे नुकसान झाले म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाणी या गावात घडली.
यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या सत्र सुरुच; तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - yavatmal faemer news
तरुण शेतकऱ्याने पिकाचे नुकसान झाले म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाणी या गावात घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात सुरू असताना ही घटना घडल्याचे समोर येत आहे.
अमोल दिगंबर अजमीरे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी सेंट्रल बँकेचे १ लाख रुपयांचे कर्ज असल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच त्यांची गोकी धरणाला लागून ४.५ एकर शेती आहे. शेतामध्ये कपाशी व सोयाबीन हे पीक होते. मात्र, भरपूर पावसामुळे शेतामध्ये पाणी गेल्याने शेतातील कापूस आणि सोयाबीन पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच डोक्यावर कर्जाचे ओझे आणि अतिवृष्टीमुळे खरिपाचे पिक वाया गेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे.
यवतमाळ जिल्हा आगोदरच शेतकरी आत्महत्यामुळे कुप्रसिद्ध आहे. आणि त्यात या घटनेने पुन्हा एकदा सरकार अपयशी ठरले आहे. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात नुकतीच सुरू आहे. त्यातच ही घटना घडली आहे.