यवतमाळ - दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्याकडे आमच्या विरोधात कोणतीही तक्रार नसताना ते घरात येऊन महिलांसह वृद्धांना धक्काबुक्की करत शिविगाळ केली. एक लाख रुपयांची मागणी केली, पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप दिग्रस येथील मुनी कुटुंबीयांनी केला आहे. ठाणेदार सोनाजी आम्ले यांना निलंबित न केल्यास घरातील सर्व सदस्य मुख्यमंत्र्यांच्या बंगल्या समोर आत्महत्या करण्याच्या इशारा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
10 ऑगस्टला झाला होता वाद
दिग्रस शहरातील गांधी नगरमधील मनीष मुनी याचा मित्रासोबत 10 ऑगस्टच्या रात्री वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर वाद दोघांनी परस्पर मिटविले. त्यामुळे पोलिसात तक्रार नसताना ठाणेदार आम्ले हे आमच्या घरी येऊन आमच्यावर बेकायदेशीर कारवाई करत महिलांसमोर शिव्या देत अटक केली. मला व माझ्या भावाला बेदम मारहाण केली. ठाणेदारांसोबत एकही महिला पोलीस कर्मचारी हजर नव्हते, असे मनीष मुनी यांचे म्हणणे आहे.