यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असलेल्या विदर्भाच्या टोकावरील दोन हजार लोकवस्तीचे पळशीगाव. या गावालगत असलेल्या पैनगंगा नदी ही विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारी आहे. मात्र, या नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह शेतकरी व इतर नागरिकांना जवळपास 45 किलोमीटरचा फेरा मारून मराठवाड्यात वा विदर्भात यावे लागत होते. या भागातील जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी दोन्ही काठावरील गावकऱ्यांना सोबत घेऊन आपण लोकसहभागातून व श्रमदान केल्यास या पैनगंगा नदीवर पुलाचे निर्माण होऊ शकते, आता मानस व्यक्त केला. त्याला गावकऱ्यांनी जोरदार पाठिंबा देत अवघ्या 14 दिवसात 15 लाख 80 हजार रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली. सर्वांचा हेतू पैनगंगा नदीवरील सेतू, हेच ब्रीद वाक्य घेऊन सतत पंधरा दिवस श्रमदान करून या नदीवर सुंदर पुलाची निर्मिती झाली.
शासनाच्या मदतीविना पूल
विदर्भ व मराठवाडा या दोन्ही नदी तीरावरील गावांनी अनेक वेळा आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, कुठल्याच प्रकारच्या मदत मिळू शकली नाही. यातच कोरोणाच्या काळात शासन आता एक रुपया ही मदत करणार नाही हे निश्चित झाले होते. जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी यापूर्वी लोकसहभाग व श्रमदानातून याच नदीवरील छोट्या प्रमाणात पुलाची निर्मिती केली होती. त्यामुळे या नदीवर लोकसहभागातून व श्रमदानातून मुलाची निर्मिती केल्यास शासनाकडे एक रुपयाही मागण्याची गरज पडणार नाही, असा विश्वास त्यांना होता. या पुलाची शासकीय किंमत बघितल्यास एक कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. मात्र, लोकसहभागातून व श्रमदानातून हा पूल केवळ पंधरा लाख रुपयात तयार झाला हे विशेष.