यवतमाळ - महागाव तालुक्यातील सातघरी येथील पंकज राठोड या कलाकाराने अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांचा हुबेहूब अर्धाकृती पुतळा साकारला आहे. पंकजच्या या कलेचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
सातघरी येथील पंकज राठोड हा अदभुत प्रतिभेचा धनी आहे. त्याने आपल्या बोटांच्या जादुई कलेने मातीला आकार देऊन चक्क इव्हांका ट्रम्प यांचा अर्धाकृती पुतळा साकारला आहे. पंकज यांना मूर्ती व कॅनव्हासवर कुंचल्यातून चित्र रेखाटन्याचा छंद आहे. पंकजने आपल्या याच छंदातून इव्हांका ट्रम्प यांचे मूर्ती साकारली आहे. यासाठी त्यांनी इव्हांकाचा फोटो समोर ठेवून मातीपासून कमळात अर्धाकृती पुतळ्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करत डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प यांचे भारतभेटीवेळी आगळेवेगळे स्वागत केले.