यवतमाळ - यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच या गावातून अवैधरित्या चंदनाची झाडे वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून या गावात सापळा रचून वनविभागाच्या फिरत्या पथकांनी व पोलिसांनी 95 किलो 730 ग्राम चंदन अंदाजे किंमत सात लाख 65 हजार रुपये जप्त केले आहे. यावेळी एका आरोपीस अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे.
हेही वाचा -यवतमाळमध्ये लहान मुलांसह म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाचे नियोजन
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, चापडोह जंगल शिवारातून चंदनाची झाडे अवैधरित्या तोडून यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच या गावातून तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेने लगेच वन विभागाचे फिरते पथक यांना माहिती देऊन मुरझडी चिंच या गावी जाऊन या गावातील गोविंद व्यवहारे यांच्या शेताजवळ सापळा रचला. या शेतातून दोन इसम पोत्यामध्ये चंदन आणत असल्याचे निदर्शनास आले. वनविभाच्या व पोलीस पथकाला पाहताच त्यांनी पळ काढला.