यवतमाळ- काम करण्याची इच्छा असली की, वय आडवे येत नाही. अमरावती येथील बालाराम गुंडीयाल यांचे वय 71 वर्षे आहे. थरथरत्या हातांनी या वयातही ते कोरोनाच्या सावटात पाच जिल्हे फिरून हातमोजे, रूमाल, लेडीज साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. यातून तीनशे ते चारशे रूपये रोज पडत असल्याने समाधानाची लकेर त्यांच्या चेहर्यावर दिसते.
कोरोनाच्या सावटातही पोटासाठी पाच जिल्ह्यात भ्रमंती - यवतमाळ कोरोनाच्या सावटातही पोटासाठी पाच जिल्ह्यात भ्रमंती
अमरावती येथील बालाराम गुंडीयाल यांचे वय 71 वर्षे आहे. थरथरत्या हातांनी या वयातही ते कोरोनाच्या सावटात पाच जिल्हे फिरून हातमोजे, रूमाल, लेडीज साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
मूळचे अमरावती येथील रहिवासी असलेले गुंडीयाल हे मागील पन्नास वर्षांपासून हातमोजे, रूमाल विक्रीचा व्यवसाय करतात. कोरोना काळापासून मास्क विक्रीलाही त्यांनी सुरुवात केली आहे. मात्र, इतर जिल्ह्यात जाण्यासाठी त्यांना मोठ्या अडथळ्याला समोर जावे लागते.
कुटुंबात मुलगा, सून, नाती आदी आहेत. मुलाला वीस हजार रुपये पगार होता. मात्र, कोरानामुळे त्याचा पगार चार हजारावर आला आणि ही नोकरीही गेली. आयुष्यात कितीही संकटे आले तरी थांबायचे नाही, असा चंग गुंडीयाल यांनी बांधला आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम यासह इतर जिल्ह्यात व्यवसायाच्या निमित्ताने बसने प्रवास करतात. थंडी, पाऊस असला तरी घरून सात वाजता निघतात आणि रात्री नऊला घरी पोहोचतात. वृद्धावस्थेतही कुटुंबाला हातभार लावण्याची धडपड प्रेरणा देणारी आहे.