यवतमाळ - जिल्ह्यात मागील दोन दिवसात 504 पक्षांचा मृत्यू झाला आहे. ‘बर्ड फ्ल्यू’चे निदान व्हायचे असले तरी मृत पक्षांचे नमुने तपासणीकरीता भोपाळला पाठविण्यात आले आहेत. पांढरकवडा तालुक्यात लिंगटी शिवारात पोल्ट्री फार्ममधील 494 मृत पक्षांचा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये म्हणून यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिले.
हेही वाचा -संध्या सव्वालाखे यांची महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
पांढरकवडा तालुक्यात लिंगटी या गावा शेजारी सायखेडा धरण असून या धरणावर परदेशातील स्थलांतरित पक्षी येतात. या गावात पोल्ट्री फार्म असल्याने मागील दोन दिवसात 494 कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे, कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज आहे. मात्र, आद्याप तपासणी अहवाल यायचा असल्याने हा संसर्ग इतर ठिकाणी पसरू नये म्हणून पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेऊन आहे.
सद्या जिल्ह्यात कुठेही निर्बंध नाही
पोल्ट्री फार्म बंद ठेवण्याचे व निरोगी पक्षाचे चिकन खाण्यास कोणतेही निर्बंध नाही. मात्र, घरी आणलेले चिकन संपूर्णपणे उकळून (बॉईल) खावे. तसेच, ते स्वच्छ केल्यानंतर हात सॅनिटाईज करावे. कुठेही पक्षाचा मृत्यू आढळून आल्यास नागरिकांनी त्या मृत पक्षाला थेट हाताचा संपर्क करू नये. याबाबत पशुसंवर्धन विभागाशी त्वरीत संपर्क करावा. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या संपर्कात राहून पक्षांचे आवागमन करण्यास निर्बंध घालावे. पांढरकवडा परिसरात हा प्रकार आढळून आल्यामुळे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणेला अलर्ट करून योग्य काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.