यवतमाळ - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लगाम लावण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना रस्त्यावर येण्यापासून परावृत्त करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी रस्त्यावर तैनात आहे. यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 400 महिला पोलीस कर्मचारी पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रखरखत्या उन्हात आपले कर्तव्य बजावत आहे.
हेही वाचा...औरंगाबाद पोलीस विभागात कोरोनाचा शिरकाव, पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना लागण
यवतमाळमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तर चक्क आपला साखरपुडा बाजूला ठेऊन कोरोनाच्या युद्धात उडी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर या गेल्या वर्षी यवतमाळ येथे रुजू झाल्या. त्यांनी आपल्या कार्यशैलीने पोलीस विभागात एक वेगळीच छाप निर्माण केली आहे. सध्या त्या सध्या कोरोनाचा उद्रेक असलेल्या भोसा परिसरात प्रतिबंधित भागात कर्तव्यावर आहेत. पुणे येथील भारतीय महसूल सेवेत नोकरीला असलेल्या एका अधिकाऱ्याच्यासोबत त्यांचा 12 एप्रिलला साखरपुडा ठरला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी कर्तव्यावर राहणे महत्वाचे मानले. 'आधी कोरोनाच्या संकटाला हद्दपार करायला पाहिजे आणि त्यानंतर मग वैयक्तिक कामाला महत्व द्यायला पाहिजे' असे त्या म्हणतात.