यवतमाळ - जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकाचे वास्तव्य असलेला शहरातील गुलमोहर पार्क आणि मेमन कॉलिनी, जाफरनगर, इंदिरानगर यासह 30 भागात रुग्ण वावरल्यामुळे येथील नागरिकांना होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडून हे आदेश जारी करण्यात आले.
शटडाऊन भागातील 33 हजार जण होम क्वारंटाईनमध्ये; प्रत्येकाच्या हातावर मारले जाणार शिक्के नागरिकांना 4 भागात होम क्वारंटाईन केले जात आहे. या भागात असलेल्या एकूण 33045 लोकांचे गृह विलगीकरण करण्यात आले असून, त्यांच्या हातावर शिक्का मारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
यवतमाळ शहरातील प्रतिबंध करण्यात आलेल्या भागासाठी प्रत्येकी 30 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 3 टिम तयार करण्यात आल्या आहेत. या भागात 6827 घरे असून 33045 लोकसंख्या आहे. आरोग्य विभागाच्या टीममार्फत ‘डोअर टू डोअर’ सर्व्हे करून सर्व लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावरती क्वारंटाईन शिक्के मारण्यात येणार आहेत. खोकला, ताप, श्वसनाचा त्रास किंवा कोव्हिड संदर्भात इतर एक-दोन लक्षणे आहे काय, याबाबत पुढील 14 दिवस हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून यंत्रणेसमोर यावे आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले आहे.