महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णांना दिलासा, यवतमाळ जिल्हा रुग्णालयात १० डायलिसीस मशीन मंजूर - मेड इन जर्मनी कंपनी

जिल्ह्यातील ज्या रुग्णांना किडनीचा आजार आहे त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात किडनीच्या आजारासाठी आवश्यक असलेला डायलिसीस मशीनचा प्रश्न निकाली निघाला आहे. आता या रुग्णालयासाठी १० मशीन मंजूर झाल्या आहेत.

डायलिसीस मशीन

By

Published : Jul 26, 2019, 2:06 PM IST

यवतमाळ -जिल्ह्यातील ज्या रुग्णांना किडनीचा आजार आहे त्यांना आता दिलासा मिळणार आहे. कारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात किडनीच्या आजारासाठी आवश्यक असलेला डायलिसीस मशीनचा प्रश्न निकाली निघाला आहे. ३ महिन्यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ डायलिसीस मशीन लावण्यात आल्या होत्या. आता या रुग्णालयासाठी १० मशीन मंजूर झाल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसीस मशीनची मागणी गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित होती. जिल्ह्यातील किडनीच्या आजाराचे रुग्ण सावंगी, सेवाग्राम, अमरावती आणि नागपूर येथे डायलिसीसकरीता जात होते. याचा रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसत होता. मात्र आता जिल्हा रुग्णालयात मशीन आल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

यवतमाळ जिल्हा रुग्णालयात १० डायलिसीस मशीन मंजूर

2018-19 मध्ये जिल्हा नियोजन समितीमधून १० डायलिसीस मशीनकरीता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यानुसार, तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सदर प्रस्ताव शासनाकडे तसेच हापकिन इन्स्टिट्युटकडे सादर केला होता. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हापकिन बायो फार्माक्युटीकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने जिल्ह्यासाठी १० डायलिसीस मशीन मंजूर केल्या. याबाबत हापकिनचे व्यवस्थापकीस संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्ली येथील फ्रेसिनिअस मेडीकल केअर इंडिया प्रा. लिमिटेड यांना मशीन पुरवठा करण्याबाबत वर्क ऑर्डर दिली आहे.

मेड इन जर्मनी कंपनीच्या या डायलिसीस मशीन असून, एका मशीनची किंमत 5 लाख 54 हजार 400 रुपये आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 55 लाख 44 हजार रुपयांत या १० मशीन लावण्यात येणार आहेत. पुरवठादार कंपनीने 12 आठवड्यांच्या आत या मशीनचा पुरवठा वैद्यकीय महाविद्यालयात करायचा आहे. सद्यस्थितीत येथे कार्यरत असलेल्या दोन मशीनद्वारे दिवसाला चार ते पाच किडनी आजारग्रस्त रुग्णांचे डायलिसीस करण्यात येते. डायलिसीसकरीता दोन प्रकारचे रुग्ण येत असून नवीन डायलिसीस करणारे आणि जे सुरुवातीपासून डायलिसीसवर आहेत, अशा रुग्णांचा यात समावेश आहे.

जुन्या रुग्णांना डायलिसीसकरीता आठवड्यातून दोन ते तीन वेळा यावे लागते. त्यामुळे दोन मशीन अपुऱ्या पडत होत्या. आता १० मशीन मंजूर झाल्यामुळे दिवसाला किमान 20 ते 25 रुग्णांचे डायलिसीस करता येईल. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्पेशल डायलिसीस युनीट तयार करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी वेगळा स्टाफ ठेवण्यात आला आहे.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डायलिसीसची सुविधा पुर्णपणे मोफत आहे. तर इतरांना शासनाच्या नियमाप्रमाणे अत्यल्प दरात ही सुविधा देण्यात येते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सदर युनिटचा समावेश झाला तर या योजनेच्या लाभार्थ्यांना ही सुविधा मोफत उपलब्ध होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details