यवतमाळ - सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नुटा सारख्या संघटना जेव्हा पुढाकार घेऊन कोविड-१९ सारख्या राष्ट्रीय आपत्तीला सामोरे जाण्यासाठी स्वेच्छेने मदत करतात. तेव्हा त्या शासन, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना या आपत्ती विरुद्ध लढण्याचे बळ मिळवून देत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले. ते नुटा या प्राध्यापकांच्या संघटनेने संकलित केलेल्या कोविड आपत्ती मदतनिधीतून खरेदी केलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या वितरण कार्यक्रमात बोलत होते.
पाच लाखांचे वैद्यकीय उपकरणे भेट -
अकरा जिल्ह्यांमध्ये शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नुटा या प्राध्यापक संघटनेने मदत निधी उभारला आहे. मदतनिधीतून एकूण २०६ नेब्युलायझर आणि ८० बीपी मॉनिटर ही वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. त्यापैकी २१६ उपकरणे जिल्ह्यातील ३० कोविड केंद्रांना आणि ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिल्या. नुटा या प्राध्यापक संघटनेने संकलित केलेल्या कोविड आपत्ती मदत निधीतून नियोजनपूर्वक वैद्यकीय उपकरणे खरेदी केली. ही शहरी तसेच ग्रामीण भागातील कोविड केंद्रांना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना अतिशय उपयुक्त ठरणार आहेत.