यवतमाळ -कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री संजय राठोड यांनी खनिज विकास निधीमधून अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कोरोना चाचणी प्रयोगशाळा आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग होऊ नये आणि संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून, 500 खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीतून तत्काळ अडीच कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्याचे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांना दिले.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच रुग्णावर तातडीने उपचार करता यावे, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या आणि मुलींच्या नवीन वसतीगृहाचे रूपांतर 500 खाटांच्या अद्ययावत रूग्णालयात करण्याचा निर्णय घेतला. या रूग्णालयात कोरोनाबाधितांवर औषधोपचार, चिकित्सालयीन साहित्य, स्वच्छताविषयक बाबी, विविध किट्स, रसायने व आवश्यक साधनसामग्रीकरीता खनिज क्षेत्र कल्याण निधीतून तातडीने एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. यामुळे भविष्यात अशा रूग्णांवर अद्ययावत उपचार करणे सोईचे होणार आहे.
कोरोना संशयितांचे अहवाल नागपूर येथून उशिरा प्राप्त होत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच कोरोना चाचणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला. करोनाबाधित व संशयितांची तपासणी करण्याकरिता ‘व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी’ (व्हीआरडीएल) उभारण्याचा निर्णय घेतला. या सुसज्ज प्रयोगशाळेकरीता खनिज क्षेत्र कल्याण निधीतून दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.