महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कोरोना नियम मोडणारी 12 दुकाने सील, प्रशासनाची कारवाई - कोरोना नियम मोडणारी 12 दुकानं सील

यवतमाळमध्ये कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. नियम धाब्यावर ठेवून येथे 12 दुकाने उघडली. पण, प्रशासनाने त्या दुकानांवर कारवाई केली. ती दुकानं सील करण्यात आली.

yavatmal
यवतमाळ

By

Published : May 8, 2021, 7:25 PM IST

यवतमाळ - कोरोना संसर्ग वाढत असून दुसऱ्या लाटेत कोरोनाने हाहाकार माजविला आहे. प्रशासनाने जिल्ह्यात १५ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू करीत अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, असे असतानाही आज (8 मे) नेताजी मार्केट सकाळीच उघडले. त्यामुळे नियम मोडणाऱ्या शहरातील 12 दुकानांना तहसील प्रशासनाने सील ठोकून कारवाई केली.

यवतमाळमध्ये नियम मोडणारी 12 दुकानं सील

शटर बंद तरीही व्यवसाय सुरू?

दुकानं उघडण्यास मनाई असतानाही काही दुकानांपुढे गर्दी होत आहे. शटर बंद असले तरी व्यवसाय सुरू आहे, असे चित्र दिसून येत आहे. नेताजी मार्केटसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये बऱ्याचशा दुकानदारांकडून लपून छपून सर्व व्यवहार सुरू आहेत. मात्र गर्दी होऊ नये व आवश्यक काळजी घेतली जावी, असे सांगून प्रशासनही कठोर भूमिका घेत नसल्याचे दिसताच दुकानदारांनी मिळालेल्या या संधीचा गैरफायदा घेतला. नेताजी मार्केटमधील दुकानदारांनी बिनधास्तपणे शटर उघडून दुकानातील कपडे, चपला आदी साहित्य बाहेर लटकावले. हे बघताच नागरिकांचीही एकच गर्दी नेताजी मार्केटमध्ये झाली.

माहिती मिळताच प्रशासनाची कारवाई

प्रशासनाने थोडी ढिलाई दाखवताच दुकानदारांनी अतिरेक करत दुकाने पूर्ण उघडली. यामुळे दुकानात ग्राहकांची गर्दी झाली. अचानक गजबजलेल्या या मार्केट बाबत प्रशासनाला माहिती होताच उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी नेताजी मार्केटमध्ये धाड टाकली. थेट कारवाई सुरू केल्याने दुकानदारांची व ग्राहकांची पळापळ झाली. काही दुकानदारांनी मार्केटच्या मागे असलेल्या टीबी हॉस्पिटलच्या आवारात साहित्य घेऊन पळ काढला.

या 12 दुकानांवर कारवाई

नेताजी मार्केटमधील देवराज फुटवेअर, तन्वी बूट हाउस, जयबाबा बूट हाउस, दर्श शूज, लव कुश, मनीष बूट हाउस, तुलसी बूट हाउस, सानिया, एस. आर. मेन्स वेअर, पाटील मेन्सवेअर, साई मेन्स, त्रिमूर्ती झेरॉक्स आदी दुकाने सुरू दिसल्याने या 12 दुकानांवर कारवाई करीत प्रशासनाने दुकानांना सील ठोकले.

अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. इतर दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. यांनतरही सुरू असलेल्या दुकानांवर महसूल पथकाने कारवाई केली. संबंधितांची दुकाने सील करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा -मराठा आरक्षणासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती

हेही वाचा -अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर लस देण्यावरून भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

ABOUT THE AUTHOR

...view details