यवतमाळ - महाराष्ट्रात देखील कोरोनाचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दुबई ते मुंबई प्रवास केलेल्या पुण्यातील दाम्पत्याचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १० जणांनी याच दाम्पत्यासोबत दुबई ते मुंबई प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबत यवतमाळमधील दहा जणांचा दुबई ते मुंबई प्रवास - कोरोना रुग्ण संख्या महाराष्ट्र
सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६२ पर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे.
दुबईवरून आलेल्या दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजताच त्यांच्यासोबत प्रवासामध्ये कोण-कोण होते? याची माहिती प्रशासनाने काढली. त्यानुसार यवतमाळमधील तीन कुटुंबातील दहा जणांनी या दाम्पत्यासोबत प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यांना दुबईवरून आलेल्या ११ दिवस झाले आहेत. सध्या त्यांना घरीच डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना पुन्हा तीन दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. काही लक्षणे दिसल्यास तपासणी करण्यात येईल. सध्या तरी संशयित रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. तसेच सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास आरोग्य यंत्रणेसोबत संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. तरंग तुषार वारे यांनी केले आहे.