वाशिम -कोरोनाच्या सावटात निवडणुका घेता येतात. मात्र, अनेक आश्वासने देऊन देखील राज्य सरकार मागील अनेक दिवसांपासुन रखडलेली पोलीस भरती सुरू करत नाही. ही पोलीस भरती केव्हा सुरू करणार, असा सवाल वाशिम जिल्ह्यातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रातून केला आहे.
शेकडो युवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले पोस्टाने पत्र इतर राज्यातील पोलीस भरती यापूर्वीच सुरू झाली असून महाराष्ट्रातील पोलीस भरती व्हावी, या मागणीसाठी हजारो युवकांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवली आहेत. यामध्ये वाशिममधील हजारो बेरोजगार उमेदवारांचाही समावेश आहे. अलीकडे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १२ हजार ५०० जागांसाठी पोलीस भरती करणार ,असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. अनेकांनी जोमाने सराव करण्यास सुरूवातही केली आहे. परंतु वर्तमान परिस्थिती पाहता पोलीस भरती होईल की नाही, हा संभ्रम वाशिम जिल्ह्यातील हजारो तरूणांसमोर असुन अनेक जण वय मर्यादेमुळे यापुर्वीच भरती प्रकियेतुन बाद झाले आहेत. तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. इतर राज्यात भरती प्रक्रिया चालू असुन राज्य शासनाने देखील लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशा आशयाचे हजारो पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवून बेरोजगार उमेदवारांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या आहेत.