वाशिम - जिल्हा सामान्य रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे. जाऊळका रेल्वे येथील एका महिलेच्या प्रसूतीदरम्यान डॉक्टरांच्या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळे महिलेच्या नैसर्गिक विधीच्या दोन्ही जागा एकत्र झाल्या. महिलेला समस्या सुरू झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भोंगळ कारभार: नर्सने घातला चुकीचा 'टाका', बाळंतिणीवर आला प्रसंग 'बाका' - Wrong stitches after delivery
वाशिम जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस यांचा गलथानपणा महिलेच्या जीवावर उठला आहे. प्रसूतीनंतर जे टाके घालण्यात आले त्यातून नैसर्गिक विधीवर परिणाम झाल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, हे मान्य करण्यास रुग्णालय तयार नाही. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
जाऊळका येथील एका गरोदर महिलेची ८ मेला प्रसूती झाली, तीही नैसर्गिक. मात्र प्रसूतीदरम्यान डॉक्टर आणि परिचारिकेने केलेला बेजबाबदारपणेचा त्रास त्या महिलेला घरी गेल्यावर सुरू झाला. होणाऱ्या त्रासाबद्दल जाऊळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन त्या महिलेच्या वडिलांनी घटना सांगितली. तर तेथील डॉक्टरांनी प्रसूती वाशिम येथे झाल्याने वाशिम येथे जाण्याची सल्ला दिला. पण वाशिम येथील डॉक्टरांनी त्या महिलेला व तिच्या वडिलांना सांगितले, की आमच्याकडून कोणती चूक झाली नाही आणि तेथून परत पाठवले.
मुळात या डॉक्टरांनी प्रसूती दरम्यान असे कसे हलगर्जीपणाने टाके मारले, की त्या महिलेच्या नैसर्गिक विधीच्या दोन्ही जागा एकत्र झाल्या. एवढी मोठी चूक झाली कशी, असा संतप्त सवाल आता महिलेच्या नातेवाईकांकडून विचारण्यात येत आहे. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी असा खेळ केला जात आहे. या महिलेने या घटनेची माहिती देतांना सांगितले, की प्रसूती डॉक्टर राठोड यांनी केली तर टाके परिचारिकेने मारले आहे. पण टाके मारण्याचा अधिकार परिचारिकांना आहे का? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे. मात्र यांना अधिकार असेल तर एवढी मोठी चूक झाली कशी? आणि नसेल तर बाळंतीणीच्या जिवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.