वाशिम - मालेगाव तालुक्यातील ग्राम अमानी येथील आदिवासी महिला या गेल्या १०० वर्षांपासून बिबा फोडणे व त्यातून गोडंबी काढणे हा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अनेक महिला आणि मुलींच्या शरीरावर इजा झाल्या आहेत. काहींचे चेहरे विद्रुप झाले आहेत. या महिलांना पोटाची खळगी भरण्यासाठी इच्छा नसतानाही बिब्याचे तेल हाती घ्यावे लागत आहे. तेच तेल या महिलांच्या सौंदर्याला मारक ठरते आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या शरीराची पर्वा न करता जीव धोक्यात टाकून कामे करावी लागत आहेत.
बिब्यातली गोडंबी काढून धनिकांची देहयष्टी सांभाळणारा येथील आदिवासी समाज मात्र बिब्याच्या तेलाने पार होरपळला आहे. गोडंबी काढताना चेहऱ्यावर उडणाऱ्या बिब्याच्या तेलाने येथील कितीतरी मुली विद्रुप झाल्याने त्यांच्या भावी संसाराची राखरांगोळी झाली आहे. हे काम विशेषत: महिला व मुलींना करावे लागत आहे. शेती आता मशीनद्वारे होते आणि दुसरे कुठलेही काम मिळत नाही. रोजगार हमी योजनेची कामेही थंड बस्त्यात आहेत. त्यामुळे घर संसाराचा गाडा कसा चालवावा हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे. म्हणून बिबा फोडणे व त्यातून गोडंबी काढणे यातून शरीरावर इजा होत आहेत.