वाशिम -दरवर्षी 3 जून रोजी आंतरराष्ट्रीय सायकल दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस सायकलची वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता ओळखण्यासाठी तसंच त्याचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. शहरातील नागरिकांनी जवळचे अंतर पूर्ण करण्यासाठी सायकलींचा वापर केला तर दररोज शेकडो लिटर पेट्रोलचा वापर कमी होईल आणि शहरातील प्रदूषण पातळीही कमी होईल, असं देखील सांगण्यात येते. सायकल चालवणाऱ्यांच्या मते यामुळे सोशल डिस्टंसिंगचे देखील पालन होते आणि ते सुरक्षित राहतात. असे सायकलपटू नारायण व्यास यांनी सांगितले. जाणून घेऊया त्यांच्या सायकलस्वारी विषयी...
सोनू सूदने केले नारायण व्यास यांचे कौतुक -
सायकलपटू नारायण व्यास यांनी सायकलने वाशिम ते मुंबई असा तब्बल 600 किमी सायकल प्रवास केला. मुंबई येथे लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर शांती व एकात्मतेचा संदेश देत वाशिम ते वाघा बॉर्डर हे अंतर १२ दिवसात पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी जनजागृतीसाठी सायकलस्वारांची ‘वाशिम ते काश्मीर’ वारी ही काढली होती. अभिनेते सोनू सूद यांनी लॉकडाऊनच्या काळात शहरात अडकलेल्या हजारो कुटुंबाना मदत केली होती. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन नारायण व्यास यांनी वाशिम ते रामसेतू ही सायकल यात्रा पूर्ण केली होती. त्यामुळे सोनू सूद यांनी नारायण व्यास यांचे कौतुक ही केले होते. ही यात्रा सिनेअभिनेते सोनू सूद यांना समर्पित केली होती.
सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे -
नारायण व्यास यांनी आज जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल चालवल्याने होणारे फायदे ही त्यांनी सांगितले व्यास यांनी ई टीव्ही भारतशी बोलतांना सांगितले की, हृदयरोग, स्ट्रोक, कर्करोग आणि मधुमेह यासारखे आजार असणाऱ्यांनी दररोज सायकल चालवल्यास मृत्यूचा धोका कमी होतो.
रोग प्रतिकारशक्ती वाढते -
दररोज सायकल चालवल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. एका अहवालानुसार दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने रोगप्रतिकारपेशी सक्रिय होतात आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो.