जिल्ह्यात विना परवानगी प्रवेश करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश - washim corona news
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हा बंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
वाशिम - जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण आढळून आला आहे. मात्र, यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून संचारबंदी व जिल्हाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून, रीतसर पूर्वपरवानगी न घेता जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकमेव रुग्ण जिल्ह्यात आढळून आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हा बंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्तीला वाशिम जिल्ह्यात प्रवेश करावयाचा असल्यास, त्यांनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा पोलीस अधीक्षक यांची रीतसर परवानगी आणणे आवश्यक आहे. विना परवानगी कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच इतर कोणत्याही मार्गांनी विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर काढून त्यांच्यावर कलम १८८ व साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक कारणासाठीच मिळणार परवानगी -
केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक कारणासाठीच जिल्ह्याबाहेर अथवा राज्याबाहेर जाण्याची परवानगी देण्याच्या सूचना शासनाने दिल्या असून अशी परवानगी देण्याचे अधिकार राज्याचे पोलीस महासंचालक आणि संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातून वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कारणासाठी वाशिम जिल्ह्यात येवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही विभागाने, अधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
अत्यावश्यक कारणासाठी महाराष्ट्रातून बाहेर राज्यात जाणाऱ्या व्यक्तींनी covid19.mahapolice.in या पोर्टलवर जावून पोलीस महासंचालक कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज करावा. या कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांना अशा परवानग्या देण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच वाशिम जिल्हांतर्गत प्रवासासाठी परवानगीकरिता सुद्धा या पोर्टलद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज करता येईल. मात्र, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाणे आवश्यक असल्यास याबाबतची रीतसर परवानगी घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातून परत वाशिम जिल्ह्यात येण्यासाठी संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक यांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे.