वाशिम- कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीच्या 1 मे पासून नियमावलीत बदल करण्यात आले आहे. सकाळी 7 ते दुपारी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र 11 नंतर विनाकारण फिरण्याऱ्यांना रस्त्यावर फिरण्यास मनाई असून, 11 वाजल्यानंतरही काही नागरिक काम नसतांना घराबाहेर बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे आज वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी एक्शन मोड मध्ये आले आहेत. वाशिम शहरातील मुख्य चौकात विनाकारण फिरण्यावर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.
ट्रिपल सीट फिरणाऱ्यांचे प्रमाण जास्त
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिलपासून संचारबंदीचे सुधारित आदेश लागू केले आहेत. १५ एप्रिल ते ५ मे या २१ दिवसांत वाशिम पोलिसांनी वाहतूक नियमांना वाकुल्या दाखविणाऱ्या जवळपास तीन हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण घटले असून, दुचाकीवर ट्रिपल सीट फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.