वाशिम - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या 14 व जिल्ह्यातील पंचायत 6 समितीच्या 27 जागा रिक्त झाल्या असून या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. या जागांपैकी 50 टक्के जागांवर महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या रिक्त 14 पैकी 7 जागांवर महिला आरक्षण निश्चित केले जाईल. तसेच कारंजा, मंगरूळपीर, मानोरा पंचायत समितीच्या प्रत्येकी रिक्त 4 पैकी 2, तसेच मालेगाव, रिसोड व वाशिम पंचायत समितीच्या प्रत्येकी रिक्त 5 पैकी 3 जागांवर महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद निवडणूक विभाग आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे 23 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता, तसेच पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत संबंधित तहसील कार्यालय येथे 23 मार्च, 2021 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील इच्छुक नागरिकांनी या आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विंचनकर यांनी केले आहे.