वाशिम- जिल्ह्यातील कारंजामध्ये विनापरवानगी चित्रपटाचे चित्रीकरण करणे भोवले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात ११ ते १२ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधामत्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्येच रस्त्यावर २० ते ३० लोकांचा जमाव दिसल्याने पोलिसांनी ६ जणांवर कारवाई केली आहे.
कारंजामध्ये विनापरवानगी चित्रपटाचे चित्रीकरण करणे भोवले; दिग्दर्शकासह कलाकारांची पोलीस ठाण्यात रवानगी
वाशिममध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना जिल्ह्यातील कारंजामध्ये विनापरवानगी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यामुळे ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कारंज्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयस्तंभ चौकाकडून काहीजण हातामध्ये लाकडी तलवारी व काठ्या घेऊन मुलीच्या मागे धावताना दिसले. त्यापाठोपाठ २० ते ३० लोकांचा जमाव देखील दिसला. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता ते एका चित्रपटाचे चित्रीकरण करीत असल्याची माहिती मिळाली. मात्र, यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना रस्त्यावर जमाव दिसला. त्यामुळे समशेर खान मनसुर खान (वय 48 वर्ष रा. कारंजा), जमील खान असद खान (वय 35 वर्ष रा. तऱ्हाळा), रहीम खान करीम खान (वय 34 वर्ष रा. अकोला), नमीता सिंह रामबहाद्दूर सिंह (वय 33 वर्ष रा. मीरारोड ईस्ट मुंबई), मिलींद प्रकाश भुजाडे (रा. बडनेरा) व दिपक वजुभाई सोळंकी (रा. दहीसर मुंबई) या सहा जणांविरूध्द कलम 135, 110, 112 व 117 मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. शिवाय कलम 41 (1) अन्वये नोटीस देऊन त्यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत समजपत्र देण्यात आले. याप्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार एस. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज पवार अधिक तपास करीत आहे.