वाशिम - कोरोना विषाणू संसर्गापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात १७ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली असून रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात शासकीय व एक खासगी अशा दोन रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत. वाशिममध्ये महिन्याकाठी साधारण २५२ बॅग रक्ताची गरज भासते. मात्र, शासकीय रक्तपेढीत केवळ १५२ बॅग रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे.
नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा -
लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. अनेक महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही पूर्वीसारखी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली नाहीत. रक्तपेढीत येऊन रक्तदान करण्यासंबंधी नागरिकांची मानसिकता राहिली नाही. तसेच लसीकरण मोहीम सुरू असल्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांना दोन महिने रक्त देता येत नाही. परिणामी रक्तसाठा कमी झाला आहे. त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी रक्तदान शिबिर घेऊन पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी केले आहे.