वाशिम: राज्य निवडणूक आयोगाने वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सहा पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम काल, २२ जून रोजी जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संबंधित क्षेत्रात २२ जून २०२१ पासून लागू झाली असून, निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. पोटनिवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे, तसेच पोटनिवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
४ जुलै रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार
वाशिम जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांची व सहा पंचायत समित्यांमधील २७ निर्वाचक गणांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार २९ जून २०२१ रोजी निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. २९ जून ते ५ जुलै २०२१ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकारी स्वीकारतील. रविवार, ४ जुलै रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाही.
१२ जुलै रोजी प्रसिद्ध होईल वैध उमेदवारांची यादी
६ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशनपत्रांची छाननी व त्यावर निर्णय देण्याची कार्यवाही होईल. त्याच दिवशी नामनिर्देशनपत्रांच्या छाननीनंतर लगेचच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. ९ जुलै २०२१ पर्यंत नामनिर्देशनपत्रांचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल. १२ जुलै २०२१ पर्यंत जिल्हा न्यायाधीश या अपिलावर सुनावणी घेवून निकाल देतील. जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी १२ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.