वाशिम - मागील ३० दिवसांपासून जिल्ह्यासह परजिल्ह्यात जाणाऱ्या सर्व बसफेऱ्या जिल्ह्यात कडक निर्बंध असल्याने प्रवाशांची कमतरतेमुळे बंद होत्या. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम आगाराला बसला आहे. एका महिन्यात या आगाराचा तब्बल दीड कोटीचा व्यवसाय बुडाला आहे.
हंगामाच्या दिवसात लालपरी जागेवर -
आगारातील वाहक, चालक, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वाशिम जिल्हांतर्गत व बाहेरील जिल्ह्यात प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाशिम आगारातील ५५ बसच्या फेऱ्या जिल्ह्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे प्रवासी नसल्याने बंद करण्यात आल्या होत्या त्याला एक महिना झाला आहे. सरासरी चार ते साडेचार लाख रुपये रोज वाशिम आगाराचा व्यवसाय होतो. तसेच उन्हाळ्यात हा व्यवसाय अधिक होतो. पावसाळ्यात प्रवासी संख्या कमी असल्याने उन्हाळी हंगामात होणाऱ्या अधिकच्या व्यवसायाने पावसाळ्यात कमी होणारे उत्पन्न या काळात भरून येत होते. नेमके हंगामाच्या दिवसात लालपरी जागेवर थांबल्याने दीड कोटींचा व्यवसाय बुडाला आहे.