पाच दिवस वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती बंद - कोविड 19
खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून आपला शेतमाल खासगी व्यापाऱ्याला विकावा लागणार आहे.
वाशिम - शहरातील निमजगा परिसरात कोरोना रुग्ण आढळला आहे. त्या परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणारे माथाडी कामगार असल्याने वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती ५ दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यात काल नव्याने ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामधील ३ रुग्ण शहरातील निमजगा परिसरातील असून,बाजार समितीत याच भागातील हमाल माथाडी कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या भागातील हमाल, माथाडी, कामगार शेतकऱ्यांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेत खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समिती प्रशासनाने पुढील पाच दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसणार असून आपला शेतमाल खासगी व्यापाऱ्याला विकावा लागणार आहे.