वाशिम- जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की आणल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे. कांरजा येथील एका शेतकऱ्याच्या भूसंपादन प्रकरणात न्यायालयाने थेट वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईतील शेतकऱ्याने न्यायलयीन अधिकाऱ्यासोबत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील 2 संगणक जप्त करून कारवाईला सुरुवात केली आङे. निरंजन गोपाळराव म्हसळकर असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कारंजा येथील शेतकरी निरंजन म्हसळकर यांची जमीन 2008 मध्ये संपादन करण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाने त्यांच्या जमिनीचा मोबदला न दिल्यामुळे या शेतकऱ्यांने मंगरूळपीर येथील दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली. संपादित केलेल्या केलेल्या जमिनीची किंमत 1 कोटी 95 लाख 31 हजार 629 रुपये आहे. त्यामुळे दिवाणी न्यायालयाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी शेतकरी आणि न्यायालयीन अधिकारी जप्तीसाठी पोहोचले. मात्र जिल्हाधिकारी हजर नसल्याने बराच वेळ येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.