वाशिम - कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आज, १९ जूनपासून ३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात आजपासून ३० ते ४४ वयोगटातील लसीकरणास सुरुवात
वाशिम जिल्ह्यात आजपासून (१९ जून)३० ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व २४ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ ग्रामीण रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय, वाशिम सामान्य रुग्णालय, वाशिम येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र असे एकूण ३३ केंद्रावर हे लसीकरण केले जाईल. या सर्व लसीकरण केंद्रावर ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थी 'ऑन स्पॉट' नोंदणी करून लस घेऊ शकतात. प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांस प्राधान्य राहील, तसेच केंद्रावर उपलब्ध असलेल्या लसीच्या डोसनुसार लसीकरण करण्यात येईल. ३० ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.
सर्व २४ प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण सुद्धा सुरू राहील. तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय व सामान्य रुग्णालय या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस व ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस, तसेच ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती डॉ. आहेर यांनी दिली आहे.