वाशिम - शहरात राहणाऱ्या अनुजा मुसळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत संपूर्ण भारतातून 511 वी रँक मिळाली आहे. ही वाशिम जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. अनुजाचे दहावीपर्यंतचे शिक्षण वाशिममध्येच झाले तर बारावी फर्ग्युसन कॉलेज पुणे आणि अभियांत्रिकी शिक्षण पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पुणे येथून झाले. तिने पुढील युपीएससी परीक्षेचा अभ्यास दिल्ली येथे केला. दुसऱ्या प्रयत्नातच लाभलेल्या अतुलनीय यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
अनुजा मुसळे आणि त्यांच्या आई छाया मुसळे यांची प्रतिक्रिया वडील वारल्यानंतर ही खचून न जाता केला नेटाने अभ्यास -
अनुजाची परीक्षा जवळ आली असता अपघातात अनुजाच्या वडीलांचा मृत्यू झाला. त्यावेळी अनुजाचे मन खचले होते. मात्र घरच्या मंडळींनी धीर देत अनुजाला हिम्मत दिली आणि आज अनुजा UPSC मध्ये 511 वी आली. अनुजा ने कोविड काळात ऑनलाइन अभ्यास केला. कोरोना काळात तिने अभ्यास सुरू ठेवल्यामुळे ह्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. वडील वारल्यानंतर ही खचून न जाता तिने नेटाने अभ्यास करून यश मिळवले आहे.
भारतीय पोलीस सेवेला देणार प्राधान्य -
परिक्षेकरिता अनुजा यांनी राज्यशास्त्र आणि आंतर राष्ट्रीय संबंध ह्या ऐच्छीक विषयची निवड केली होती. तिला प्रशासकीय सेवेतून भारतीय पोलीस सेवा किंवा भारतीय राजस्व सेवा अपेक्षित आहे. संपूर्ण जिल्ह्यातून मित्र परिवार, नातेवाईक तथा शुभचिंतक हे अनुजाचे कौतुक करत आहेत. आपल्या यशाचे श्रेय अनुजा यांनी आपले आई, वडील, भाऊ आणि शिक्षक यांना दिले आहे.
'पालकांनी मुलीला यशस्वी होण्यासाठी बाहेर पाठवावे'
एकट्या मुलीला तुम्ही बाहेर कशी पाठवता? असे नेहमी समाजातून आम्हाला प्रश्न केले जात होते. मात्र आम्ही कोणत्याही गोष्टीला मनावर न घेता आमच्या मुलीला दिल्लीला शिक्षणासाठी पाठवले आणि आमच्या मुलीने आम्ही ठेवलेला विश्वास आणि आमचे स्वप्न पूर्ण केले. याचे मला कौतुक वाटते. आज महाराष्ट्रात किंवा देशात ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यातून नकारात्मक न होता. आपल्या मुलीवर विश्वास ठेऊन प्रत्येक पालकाने तिला यशस्वी होण्यासाठी बाहेर पाठवावे, असे मत अनुजा यांच्या आई छाया मुसळे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा -UPSC Topper Ria Dabi : 2015 बॅचची IAS टॉपर टीना डाबीची बहिण रिया डाबीचे UPSC परीक्षेत नेत्रदीपक यश