वाशिम - कोरोना महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय बदलले तर काहींच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे अनेकजण नोकरी सोडून गावी परतले. अशाच एका कारंजातील सारंग राजगुरे या मेकॅनिकल इंजिनिअर युवकानेही पुणे सोडून गाव गाठले आणि चहा व नाश्ता कॅन्टिन टाकून बेरोजगारीवर मात केली.
कारंजा येथील सारंग राजेंद्र राजगुरे या तरूणाने अमरावती येथून मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. त्यानंतर पुण्यातील एका कंपनीत तो नोकरी करत होता. मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत गेला. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडली. त्यामुळे सारंग बेरोजगार झाला. बेरोजगार झाल्याने गावात परत यावे लागले. सांरगपुढे रोजगाराचा मोठा प्रश्न होता. अखेर सारंगने चहा आणि नाश्ता कॅन्टिन टाकण्याचा निर्णय घेतला आणि व्यवसाय सुरू झाला.
वडिलांचे तीन महिन्यांपासून वेतन नाही...
सारंगचे वडील एसटी महामंडळात नोकरीवर आहे. लॉकडाऊनमुळे एसटी सेवा ठप्प होत्या. त्यामुळे जवळपास चार महिन्यांपर्यंतचे वेतन झाले नाही. शिवाय सारंगचीही नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक चणचण भासायला लागली. सारंगला रोजगार मिळवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे सारंगने या व्यवसायाची निवड केली.